नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून देशभरात वातावरण तापलेले असतानाच, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या नामांकित कोचिंग क्लासेसवर मोठी कायदेशीर कारवाई केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) यशाचे खोटे दावे करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याबद्दल दोन मोठ्या संस्थांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये कोटा येथील 'मोशन एज्युकेशन'ला १० लाख रुपये आणि राजस्थानच्या सीकर येथील 'करिअर लाइन कोचिंग'ला ५ लाख रुपयांचा दंड झाला आहे.
हे ही वाचा
या संस्थांनी नीट आणि आयआयटी-जेईई परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाचे मोठे आकडे फुगवून सांगितले, परंतु त्यामागील मूळ सत्य लपवून ठेवले. अनेक विद्यार्थी हे केवळ टेस्ट सीरिज किंवा ऑनलाइन बॅचपुरतेच मर्यादित होते, तरीही संस्थांनी त्यांना आपले रेगुलर विद्यार्थी दाखवून यशाचे श्रेय लाटले. काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षा संपल्यानंतर प्रवेश घेतला होता, तरीही त्यांचे फोटो जाहिरातींमध्ये झळकवण्यात आले. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचे हे थेट उल्लंघन असल्याचे सांगत प्राधिकरणाने आतापर्यंत ६० हून अधिक संस्थांना नोटिसा पाठवल्या आहेत, तर ३१ संस्थांवर तब्बल १.३९ कोटी रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला आहे.

0 Comments