नवी दिल्ली
पिढ्यानपिढ्या चालत आलेली जातीवर आधारित व्यावसायिक ओळख आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. संसदीय समितीने शिफारस केली आहे की, मोची, कुंभार, धोबी आणि न्हावी यांसारख्या पारंपरिक व्यवसायांना त्यांच्या जातीऐवजी त्यांच्या कौशल्यानुसार नवीन ओळख दिली जावी. तिरुची शिवा यांच्या अध्यक्षतेखालील उद्योगविषयक संसदीय स्थायी समितीने सुचवले आहे की, 'मोची' यांना पादत्राण कारागीर, 'कुंभार' यांना मातीचे उत्पादन निर्माते, 'धोबी' यांना लाँड्री सेवा प्रदाता आणि 'न्हावी' यांना वैयक्तिक सौंदर्य सेवा प्रदाता (Personal Care Service Provider) म्हणून संबोधण्यात यावे.
अनेक राज्यांमध्ये या व्यवसायांसोबत जोडलेल्या सामाजिक रूढींमुळे तरुण पिढी हे काम स्वीकारण्यास कचरते, ज्यामुळे या क्षेत्राची प्रगती खुंटते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाने या व्यवसायांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढून 'कार्य-आधारित' नावे द्यावीत, जेणेकरून या कारागिरांना सन्मानाची वागणूक मिळेल. यासाठी राज्यांशी चर्चा करून संपूर्ण देशात एक सुधारित व्यावसायिक यादी (Trade List) जाहीर करण्याची मागणी समितीने केली आहे.
याव्यतिरिक्त, अगदी छोट्या व्यावसायिकांना बळ देण्यासाठी 'नॅनो एंटरप्राइजेस' (Nano Enterprises) नावाची एक नवीन श्रेणी सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी १० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्याचे सुचवले आहे. सध्या एमएसएमईमध्ये ९९.३ टक्के उद्योग सूक्ष्म श्रेणीत येतात, ज्यामुळे मोठ्या उद्योगांच्या तुलनेत खऱ्या गरजूंना सरकारी योजनांचा लाभ मिळणे कठीण होते. नॅनो श्रेणी तयार केल्यामुळे शेवटच्या स्तरावरील उद्योजकांना थेट सरकारी मदतीचा हात मिळू शकेल.

0 Comments