शिर्डी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून बनावट खाती उघडण्यात आल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते. त्यानुसार प्रतिभा चाकणकर, त्यांचा मुलगा तन्मय आणि वकील जयश्री काळे-पालवे चौकशीसाठी उपस्थित राहिले. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या उपस्थितीत सुमारे पाच तास ही चौकशी प्रक्रिया पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या नावावर एकूण १०० खाती असून, त्यापैकी चार खाती प्रतिभा आणि तन्मय चाकणकर यांच्या नावे असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून करोडो रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. यावर स्पष्टीकरण देताना प्रतिभा चाकणकर म्हणाल्या की, पोलिसांकडून मिळालेल्या नोटीसची माहिती त्यांना प्रसारमाध्यमांतून कळाली. तपासादरम्यान समोर आलेली कागदपत्रे आणि त्यावरील स्वाक्षऱ्या आपल्या नसून, या आर्थिक व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुढील कायदेशीर सल्ला घेऊन आणि कागदपत्रांची पडताळणी करून या प्रकरणी गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

0 Comments