मुंबई
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषाचार्य अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, त्याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग केला असून, त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवल्याचे समजते.
अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचे रूपाली चाकणकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. एका बलात्काराच्या आरोपीचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीने महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहणे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. या वाढत्या दबावानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ही मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
राजीनामा देण्यापूर्वी रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी अशोक खरात प्रकरणाची उच्चस्तरीय आणि वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आपण महिलांच्या न्याय-हक्कासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली असली तरी, या राजीनाम्यामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत खळबळ उघड झाली आहे.

0 Comments