संगमनेर
संगमनेर पंचायत समिती कार्यालयात सोमवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांच्यावर १० जणांच्या टोळक्याने भर दिवसा जीवघेणा हल्ला केला. शेडगाव येथील एका महिला सी.आर.पी. (CRP) चे मानधन रोखल्याचा राग मनात धरून शरद थोरात याने आपल्या साथीदारांसह कोकाटे यांच्या केबिनमध्ये थेट प्रवेश केला आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कोकाटे गंभीर जखमी झाले असून, शासकीय कार्यालयात शिरून झालेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नंदलाल कोकाटे यांनी याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी शरद थोरात, अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात यांच्यासह ९ ते १० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि मारहाण करणे या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. कायद्याचा कोणताही धाक न बाळगता थेट शासकीय दालनात घुसून करण्यात आलेल्या या हल्ल्याचा तालुकाभर निषेध व्यक्त होत आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी शासकीय कर्मचारी संघटनांनी केली असून, या घटनेमुळे महसूल आणि पंचायत राज विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

0 Comments