मुंबई
महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी उत्तम आणि प्रभावी संवाद साधता यावा यासाठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ज्या चालकांना दैनंदिन व्यवहारापुरते मराठी बोलता किंवा समजता येत नाही, त्यांना परिवहन विभागाकडून थेट नोटीस बजावण्यात येत आहे. नोटीस मिळाल्यानंतर संबंधित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या दिलेल्या कालावधीत जर चालकांनी मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आत्मसात केले नाही, तर त्यांचा वाहन चालक बिल्ला म्हणजेच बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे. मुंबई महानगर प्रदेशात ३,९९५ चालकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६०४ चालकांना नोटीस देण्यात आली आहे, तर राज्याच्या उर्वरित भागांत ४,२२२ चालकांची तपासणी करून ६६४ जणांवर नोटीसची कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत संपूर्ण राज्यात एकूण ८,२१७ चालकांची तपासणी पूर्ण झाली असून १२६८ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सोय लक्षात घेऊन ही मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सातत्याने राबवली जाणार आहे.

0 Comments