MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

'ताल २' च्या स्क्रीप्टचे काम पूर्णत्वाकडे; सुभाष घई यांनी अखेर दिली सुखद बातमी

'ताल २' च्या स्क्रीप्टचे काम पूर्णत्वाकडे; सुभाष घई यांनी अखेर दिली सुखद बातमी

बॉलिवूडचे 'शो मॅन' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. १९९९ मध्ये आलेल्या आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीतमय प्रेमकथेचा एक मैलाचा दगड ठरलेल्या 'ताल' चित्रपटाचा सिक्वेल अर्थात 'ताल २' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुभाष घई यांनी नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, 'ताल २' च्या स्क्रीप्टचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते आता या चित्रपटाच्या निर्मितीचा गांभीर्याने विचार करत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मूळ 'ताल' चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केले होते. ए.आर. रहमान यांचे संगीत आणि चित्रपटातील व्हिज्युअल ट्रिट आजही सिनेप्रेमींच्या लक्षात आहे.

सुभाष घई यांनी अलीकडेच सोशल मीडियावर "आजच्या काळात 'ताल २' बनू शकतो का?" असा प्रश्न विचारून इंटरनेटवर मोठी चर्चा घडवून आणली होती. याबद्दल अधिक बोलताना ८१ वर्षीय दिग्दर्शक म्हणाले, "गेल्या १५ वर्षांपासून मला हा एकच प्रश्न विचारला जात आहे की, 'ताल'चा पुढचा भाग कधी येणार? त्या चित्रपटाची ऊर्जा इतकी शक्तिशाली आहे की आजची 'जेन-जी' (Gen-Z) पिढी देखील मला 'ताल २' बनवण्याबद्दल सांगत आहे. परंतु, 'ताल'चा विषय दिसायला जेवढा सोपा वाटतो, वास्तवात तो हाताळणे तितकेच कठीण आहे. आम्ही आता या चित्रपटाची स्क्रीप्ट पूर्ण करण्याच्या टप्प्यावर आहोत आणि आम्हाला वाटते की हीच योग्य वेळ आहे. मात्र, हा चित्रपट बनवण्यासाठी त्यातील 'शुद्धता' (Purity) टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

कास्टिंगबद्दल आपले मत मांडताना घई यांनी एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "जेव्हा 'ताल' बनला होता, तेव्हा अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय हे चित्रपटसृष्टीत नवीन होते, त्यामुळे त्यांची ती निरागसता आणि शुद्धता पडद्यावर उमटली. अनिल कपूर तेव्हा स्टार होते आणि त्यांना चित्रपटात स्टार म्हणूनच दाखवण्यात आले होते. एक चांगली स्क्रीप्ट लिहिल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी कास्टिंगची असते. माझे जे चित्रपट चालले नाहीत, त्यामागे चुकीचे कास्टिंग हेच मुख्य कारण होते." यामुळे 'ताल २' साठी घई पुन्हा एकदा नवीन चेहऱ्यांच्या शोधात असणार की जुन्याच कलाकारांना घेऊन काही प्रयोग करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अलीकडेच त्यांनी अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या 'सैयारा' या गाण्याचेही कौतुक केले असून, नव्या पिढीतील कलाकारांकडे ते आशेने पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे.


Post a Comment

0 Comments