श्रीरामपूर
श्रीरामपूर शहराचा ऐतिहासिक जातीय सलोखा आणि शांतता धोक्यात आणणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कठोर कारवाई करा, अन्यथा जनतेसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या हिंसक घटना आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आमदार ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. शहरात भरदिवसा होणाऱ्या हत्या, हाणामाऱ्या आणि अवैध शस्त्रांच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन या घटना रोखण्यात हतबल ठरल्याचा आरोप करत व्यापारी, डॉक्टर, वकील आणि प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांना निवेदन दिले. 'सकाळ'ने मांडलेल्या व्यथेची दखल घेत आता संपूर्ण शहर सुरक्षिततेसाठी आक्रमक झाले आहे.

0 Comments