भारतीय पॅरा-धनुर्धारकांनी बँकॉक येथे झालेल्या 'जागतिक आर्चरी पॅरा सिरीज २०२६' मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशा एकूण १३ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, भारताने दुसऱ्या क्रमांकावरील इंडोनेशियाच्या तुलनेत दुप्पट पदके जिंकली आहेत. या दैदिप्यमान यशानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज दिल्लीत भारतीय पथकाचे जंगी स्वागत आणि सत्कार केला. यावेळी बोलताना मांडविया म्हणाले की, "हे केवळ खेळाडूंचे यश नसून संपूर्ण देशाचा अभिमान आहे." भारताची स्टार धनुर्धर शीतल देवी हिने दोन सुवर्ण पदकांसह आपली चमक दाखवली, तर पायल नाग हिने चतुःअंगविच्छेदित (quadruple amputee) असूनही सुवर्णपदक जिंकून जगासमोर जिद्दीचा नवा आदर्श ठेवला आहे. भारतीय खेळाडूंच्या या यशामुळे आगामी पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांसाठी देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकारने खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षणाची हमी दिली असून, या विजयामुळे भारतातील पॅरा-स्पोर्ट्सला एक नवी दिशा मिळाली आहे.
हे ही वाचा

0 Comments