नवी दिल्ली
आम आदमी पार्टीमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षाने खासदार राघव चढ्ढा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी आता पंजाबमधील खासदार आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक मित्तल यांची वर्णी लागली आहे. केवळ पदच नाही, तर चढ्ढा यांचा संसदेतील बोलण्याचा हक्कही पक्षाने काढून घेतला आहे. राज्यसभा सचिवालयाला दिलेल्या पत्रात 'आप'ने स्पष्ट केले आहे की, यापुढे चढ्ढा यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्याची वेळ दिली जाऊ नये.
राघव चढ्ढा गेल्या काही काळापासून पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपासून आणि प्रचारापासून लांब असल्याचे दिसत होते, त्यामुळेच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांचे उत्तराधिकारी अशोक मित्तल हे 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'चे संस्थापक असून त्यांच्या निवडीमुळे पंजाबमधील पक्षाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या धक्कादायक निर्णयामुळे पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत असले तरी चढ्ढा यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

0 Comments