अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात ९ मार्च रोजी गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सागर मोहोळकरवर ९ मार्च रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले.
या प्रकरणाचा तपास करताना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान चार आरोपींची नावे समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे.
सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, या हल्ल्यामागे कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे कनेक्शन आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान सागर मोहोळकर आणि निलेश घायवळ यांच्यात वाद झाला होता आणि मोहोळकरने घायवळच्या कानशिलात लगावली होती, अशी चर्चा आहे. या जुन्या वादाचाच हा बदला आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मोहोळकरवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने, या हत्येमागचा नेमका सूत्रधार कोण आणि हे प्रकरण कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments