मुंबई
राज्यात सध्या जाणवत असलेल्या इंधन आणि घरगुती गॅसच्या तीव्र टंचाईवरून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना, सरकार मात्र ही बाब गांभीर्याने घेण्याऐवजी प्रचारात मग्न असल्याचा आरोप राऊतांनी केला. "गॅस सिलिंडरअभावी ४० टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद पडली असून, अनेक कामगार बेरोजगार होऊन गावाकडे परतू लागले आहेत. मात्र, या गंभीर विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्यासाठी सरकारकडे वेळ नाही," असा घणाघात त्यांनी केला. ठिकठिकाणी लागलेल्या गॅसच्या रांगांवरून त्यांनी सरकारला घेरले असून 'नरेन्द्र गायब, सिलेंडर गायब' अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली.
देशातील इंधन परिस्थिती नेमकी काय आहे, हे सरकारने जनतेसमोर येऊन स्पष्ट करायला हवे, अशी मागणी राऊतांनी लावून धरली आहे. केवळ अधिकृत अफवा पसरवून परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा करणे चुकीचे असून, सामान्य नागरिक आणि उद्योजक या टंचाईमुळे होरपळून निघत असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय राजकारणातील अपयशामुळे ही वेळ ओढवली असून, गॅस वितरणातील गोंधळ तातडीने थांबवून सरकारने प्रशासनाला कामाला लावावे, असे आवाहन त्यांनी केले. गॅस बुकिंगसाठी २४ ते २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने जनतेमध्ये मोठा संताप असून सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

0 Comments