आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) या लोकप्रिय फ्रँचायझीची मालकी आता बदलली असून, आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने तब्बल १६,७०० कोटी रुपयांना ($१.७८ अब्ज) ही टीम खरेदी केली आहे. या ऐतिहासिक व्यवहारानंतर सोशल मीडियावर उद्योजक आणि प्रसिद्ध गायिका अनन्या बिर्ला हिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांमध्ये आता अशी उत्सुकता आहे की, सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन यांच्याप्रमाणेच अनन्या बिर्ला देखील आरसीबीचा नवा आणि ग्लॅमरस चेहरा म्हणून मैदानात दिसेल का?
या नवीन मालकी आराखड्यानुसार, अनन्याचा भाऊ आणि माजी क्रिकेटपटू आर्यमन विक्रम बिर्ला हा आरसीबीचा नवीन अध्यक्ष (Chairman) म्हणून पदभार स्वीकारणार आहे. या कन्सोर्टियममध्ये आदित्य बिर्ला समूहासोबत टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, डियाजिओच्या मालकीच्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून (USL) आरसीबीच्या पुरुष आणि महिला (WPL) अशा दोन्ही टीम्सचे १००% शेअर्स या गटाने विकत घेतले आहेत.
अनन्या बिर्लाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आरसीबीच्या चाहत्यांचे आभार मानले असून तिच्या भावाचे अभिनंदन केले आहे. अनन्याने वयाच्या १७ व्या वर्षी 'स्वतंत्र मायक्रोफिन'ची स्थापना केली होती आणि ती एक यशस्वी बिझनेस लीडर म्हणून ओळखली जाते. तिचे फॅन फॉलोइंग आणि क्रिकेटमधील वाढता रस पाहता, आगामी आयपीएल हंगामात ती आरसीबीच्या स्टँड्समध्ये टीमला प्रोत्साहन देताना दिसण्याची दाट शक्यता आहे. या मोठ्या व्यवहारामुळे आरसीबी आता आयपीएलमधील सर्वात मौल्यवान फ्रँचायझी ठरली असून, बिर्ला कुटुंबाच्या आगमनाने संघात नवीन ऊर्जा येईल, अशी आशा चाहत्यांना आहे.

0 Comments