जम्मू
जम्मूमध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान बुधवारी रात्री नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करण्यात आला. जम्मूतील ग्रेटर कैलाश येथील रॉयल पार्क भागात ही खळबळजनक घटना घडली. एका वरिष्ठ नेत्याच्या मुलीच्या लग्नासाठी अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित असताना कमल सिंह जामवाल नावाच्या ६३ वर्षीय व्यक्तीने त्यांच्यावर अत्यंत जवळून गोळी झाडली. सुदैवाने, अब्दुल्ला यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे गोळीचा रोख बदलला आणि मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला दहशतवादी कृत्याचा भाग नसून वैयक्तिक रागातून करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी कमल सिंह जामवाल हा जम्मूमधील स्थानिक रहिवासी असून, त्याने मागील २० वर्षांपासून हा कट रचल्याची कबुली दिली आहे. हल्ल्याच्या वेळी तो नशेत होता आणि त्याच्याकडे परवानाधारक पिस्तूल सापडले आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली असून, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या डॉ. फारूक अब्दुल्ला सुरक्षित असून पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.

0 Comments